Home » नवी मुंबई उद्योगांवर युद्धाचा परिणाम; गॅस तुटवडा आणि महागाईमुळे कंपन्या अडचणीत

नवी मुंबई उद्योगांवर युद्धाचा परिणाम; गॅस तुटवडा आणि महागाईमुळे कंपन्या अडचणीत

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील उद्योगांवरही दिसू लागला आहे. नवी मुंबईतील इंडस्ट्रियल बेल्टमध्ये अनेक कंपन्यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस तुटवडा, रॉ मटेरियलची वाढती किंमत आणि एक्सपोर्ट अडथळ्यांमुळे उद्योग क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.दरम्यान, उद्योगपतींच्या मते जर ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली तर अनेक कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई हा महाराष्ट्रातील एक मोठा औद्योगिक परिसर मानला जातो. येथे सुमारे साडेतीन ते चार हजार छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत.मात्र सध्या या कंपन्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गॅस तुटवड्यामुळे अनेक उत्पादन प्रक्रिया थांबल्या आहेत.त्यामुळे काही ठिकाणी कामगारांना काम नसल्याने बसून राहावे लागत आहे.

दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्षाचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे. यामुळे इम्पोर्ट-एक्सपोर्टमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.तसेच अनेक रॉ मटेरियलचे दर वाढले आहेत.उद्योग संघटनांच्या मते प्लास्टिक, स्टील आणि केमिकल उद्योगांना सर्वाधिक फटका बसत आहे.उद्योगपतींच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.स्टेनलेस स्टीलच्या किमतीत एका किलोमागे सुमारे 20 रुपयांची वाढ झाली आहे.लोखंडाच्या किमतीतही जवळपास 4 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.फार्मास्युटिकल आणि केमिकल उद्योगांना मोठा फटका बसत आहे. कारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इम्पोर्टवर अवलंबून राहावे लागते.

गॅस तुटवड्यामुळे उत्पादन थांबले

गॅस हा अनेक उद्योगांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. विशेषतः मेटल कटिंगसाठी गॅसचा वापर केला जातो.मात्र सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादन प्रक्रिया थांबली आहे.त्यामुळे कामगारांना काम देणेही कंपन्यांसाठी कठीण झाले आहे.यामुळे उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवरही संकट ओढवू शकते.कारण उत्पादन थांबल्यास कंपन्यांना कामगारांना लेऑफ द्यावे लागू शकते.उद्योगपतींच्या मते कंपनी मालक किती दिवस स्वतःच्या पैशातून पगार देणार हा देखील मोठा प्रश्न आहे.दरम्यान, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पुढील चार ते पाच दिवस परिस्थितीसाठी महत्वाचे असतील.

जर युद्धाची परिस्थिती कायम राहिली तर नवी मुंबईतील अनेक कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे.तसेच उत्पादन आणि एक्सपोर्टवर मोठा परिणाम होऊ शकतो.नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र सध्या मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. गॅस तुटवडा, रॉ मटेरियल महागाई आणि एक्सपोर्ट अडथळे यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत. मात्र परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काही दिवसांत अनेक कंपन्यांना मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!